बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलीस विभाग, महानगरपालिका, परिवहन आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ३७ व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिन्याचे आयोजन करण्यात आले. जिल्हा न्यायालयापासून राणी चन्नम्मा चौकापर्यंत काढलेल्या पदयात्रेद्वारे नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जागृती करण्यात आली.


बेळगावमध्ये ३७ व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिन्यानिमित्त जिल्हा न्यायालय, रायण्णा चौक ते चन्नम्मा चौक दरम्यान भव्य रॅली काढण्यात आली. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून अपघातमुक्त समाज निर्मितीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश संदीप पाटील यांनी केले. लहानपणापासूनच मुलांमध्ये रस्ते सुरक्षेची जाणीव निर्माण केल्यास भविष्यात ते नियमांचे पालन करतील. अपघात प्रसंगी वेळ न घालवता पीडितांना मदतीचा हात द्यावा, रस्ते सुरक्षा नियम हे केवळ नावापुरते नसून स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पाळणे गरजेचे असल्याचे न्यायाधीश संदीप पाटील यांनी म्हटले.
रस्ते सुरक्षा अभियान आता केवळ आठवड्यापुरते मर्यादित न राहता दरमहा राबवले जात आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नागेश मुंडास यांनी सांगितले. देशात १६ ते ३६ वयोगटातील तरुणांचा रस्ते अपघातात दर मिनिटाला मृत्यू होत असून पाच जण जखमी होत आहेत. हे प्रमाण रोखून शून्य अपघातांचे उद्दिष्ट गाठणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे नागेश मुंडास यांनी म्हटले.
या रॅलीमध्ये पोलीस आयुक्त श्री भूषण गुलाबराव, उपायुक्त एस. निरंजन अरस, सदस्य सचिव संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. विविध विभागांचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी घोषणांचे फलक हाती घेऊन रस्ते सुरक्षेचा संदेश दिला.


Recent Comments