कणबर्गी येथील जमिनीच्या वाटणीवरून न्यायालयीन आदेश असतानाही इतर वारसदारांची फसवणूक करून जमीन हडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी न्यायासाठी पीडित वारसदारांनी आज बेळगाव शहर पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संरक्षणाची मागणी केली.

बेळगाव तालुक्यातील कणबर्गी येथील सर्व्हे नंबर ८५/१ आणि ८६/१ या जमिनीवरून मलाई कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद सुरू आहे. या जमिनीबाबत न्यायालयाने एकूण १३ वारसदारांना हक्क देण्याचे आदेश दिले होते. मात्र, असे असतानाही केवळ ५ जणांनी इतर ७ वारसदारांना अंधारात ठेवून सरकारी कागदपत्रांवर स्वतःचीच नावे लावून घेतली असल्याचा गंभीर आरोप श्रीकांत मलाई व इतर पीडितांनी केला आहे.
फसवणूक झालेल्या कुटुंबातील सदस्यांनी असाही आरोप केला आहे की, जेव्हा ते आपल्या हक्काच्या जमिनीवर जातात, तेव्हा त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. फसवणूक करणारे व्यक्ती आता ही जमीन परस्पर विकण्याचा प्रयत्न करत असून, त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी आणि सातही वारसदारांची नावे सरकारी रेकॉर्डला समाविष्ट करावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी नागेश मलाई, आनंद मलाई, कल्लाप्पा मलाई, मनोहर मलाई, गंगूबाई मलाई, श्यामसुंदर मलाई यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.


Recent Comments