विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि समस्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी विश्वेश्वरैया तांत्रिक विद्यापीठाने (व्हीटीयू) ‘ई-विद्यार्थी मित्र’ हे नवीन पोर्टल सुरू केले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विद्याशंकर एस. यांनी गुरुवारी बेळगाव येथील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर करणे ही विद्यापीठाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थी या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून आपल्या तक्रारी किंवा शंका केंद्रिकृत पद्धतीने मांडू शकतील. हे पोर्टल कुलगुरू कार्यालयाशी थेट जोडलेले असल्याने सेवा वितरणात अधिक पारदर्शकता आणि वेग येईल, असा विश्वास प्रा. विद्याशंकर एस. यांनी व्यक्त केला.
या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रत्येक तक्रारीला एक ‘युनिक आयडी’ दिला जाणार आहे. या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या तक्रारीची स्थिती जाणून घेऊ शकतात. प्रत्येक तक्रार कुलगुरू कार्यालयाच्या देखरेखीखाली असेल आणि संबंधित विभागाला ती ठराविक वेळेत सोडवणे बंधनकारक राहील, अशी माहिती कुलगुरू प्रा. विद्याशंकर एस. यांनी दिली.
या प्रणालीमुळे तक्रार निवारणाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार असून, ज्या तक्रारींचे निवारण कनिष्ठ स्तरावर होणार नाही, त्या थेट कुलगुरू स्तरावर सोडवल्या जातील. या पत्रकार परिषदेला प्रा. यु. जे. उज्ज्वल आणि प्रा. प्रसाद रामपूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


Recent Comments