काँग्रेस पक्षाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’चे नाव बदलून मोदी सरकार लोकांच्या हक्कांची चोरी करत असल्याचा आरोप करत ग्रामीण मजुरांच्या संघटनेने कडोली येथे निदर्शने केली.

कडोली ग्रामपंचायतीसमोर जमा झालेल्या ग्रामीण मजुरांनी आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कडोली ग्रामपंचायतीचे पीडीओ कृष्णाभावी भंडारी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले. मनरेगा योजनेतून महात्मा गांधींचे नाव वगळून केंद्र सरकार केवळ राजकारण करत असून गरिबांच्या जगण्याचा आधार असलेल्या या योजनेचे अस्तित्व धोक्यात आणले जात असल्याची टीका आंदोलकांनी केली.
ग्रामीण भागातील जनतेला हक्काचा रोजगार मिळवून देणाऱ्या या महत्त्वपूर्ण योजनेचे नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न निंदनीय असल्याचे आंदोलकांनी म्हटले. केवळ निवडक गावांमध्येच कामे करण्याच्या नवीन नियमांमुळे इतर गावांतील मजुरांवर उपासमारीची वेळ येईल आणि मोदी सरकार ही योजना हळूहळू बंद करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केला.
या आंदोलनात अनिता बेळगावकर, वंदना कुट्टरे, पुष्पा मजगावी, अश्विनी पाटील, प्रभावती बिर्जे यांच्यासह कडोली ग्रामपंचायतीचे पीडीओ कृष्णाभावी भंडारी आणि शेकडो महिला मजूर उपस्थित होत्या.


Recent Comments