बेळगावसह सीमाभागातील अन्यायाविरुद्ध सुरू असलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शनिवारी भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. हुतात्मा चौकातील मुख्य कार्यक्रमानंतर शहरातून मूकफेरी काढण्यात आल्यानंतर, जोपर्यंत सीमाभाग महाराष्ट्रात विलीन होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


शहरातील हुतात्मा चौकात आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, शहर समिती आणि शिवसेनेच्या वतीने हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. ज्येष्ठ सदस्य राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून हुतात्म्यांच्या प्रतिमेला नमन करण्यात आले. यावेळी मालोजीराव अष्टेकर, रणजीत चव्हाण पाटील, माजी महापौर सरिता पाटील, रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, नेताजी जाधव, प्रकाश मरगाळे, प्रकाश शिरोळकर, अमर येळ्ळूरकर, आप्पासाहेब गुरव, बापू जाधव, मदन बामणे, महेश बिर्जे आणि धनराज गवळी यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.

अभिवादन कार्यक्रमानंतर हुतात्मा चौकातून मूकफेरीला सुरुवात झाली. रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनुसुरकर गल्ली आणि किर्लोस्कर रोडमार्गे ही फेरी पुन्हा हुतात्मा चौकात आली. या फेरीदरम्यान ‘अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे’ आणि ‘बेळगाव-कारवार-निपाणी-बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी झाले होते.
फेरीचे रूपांतर सभेत झाल्यानंतर बोलताना राजाभाऊ पाटील यांनी केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचनेवेळी महाराष्ट्रावर केलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. संयुक्त महाराष्ट्र समिती आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा हा लढा अद्याप संपलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सीमाभाग महाराष्ट्राला जोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी शपथ घेऊनच आपण हा हुतात्मा दिन पाळत असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्र सरकारने हा प्रश्न आपला मानून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली आहे, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
सीमाप्रश्नाचे प्रकरण भारताच्या संसदेकडे पुन्हा पाठवावे आणि तिथेच याचा अंतिम निर्णय व्हावा, अशी साधी मागणी न्यायालयात करण्यात आली असल्याचे राजाभाऊ पाटील यांनी सांगितले. ही मागणी मान्य होईपर्यंत लढा सुरूच ठेवावा लागेल, असे सांगून त्यांनी ७० वर्षांपासूनचे मराठी भाषिकांचे अभेद्य ऐक्य कायम राखण्याचे आवाहन केले. याप्रसंगी रणजीत चव्हाण पाटील यांच्यासह उपस्थित इतर नेत्यांनीही आपले विचार मांडले.
सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणातून सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला. दरवर्षीप्रमाणे १७ जानेवारीचा हा कार्यक्रम शांततेत पार पडला असला, तरी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी म्हणून हुतात्मा चौक आणि परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.


Recent Comments