बेळगावात अलीकडेच पार पडलेल्या हिंदू मेळाव्यात भाजप आमदार अभय पाटील यांनी मुस्लिम व्यापाऱ्यांशी व्यवहार न करण्याचे आवाहन केले होते. या विधानाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी मुस्लिम संघटनांच्या नेत्यांनी शुक्रवारी निदर्शने केली आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

बेळगावातील हिंदू आणि मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने एकत्र राहत असताना, आमदार अभय पाटील यांनी केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा दावा आंदोलकांनी यावेळी केला. अशा विधानांमुळे शहरात तेढ निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
भारतीय संविधानानुसार लोकप्रतिनिधीने सर्व नागरिकांशी समान वागणूक देणे आणि सामाजिक एकता टिकवणे आवश्यक आहे. मात्र, विकास, रोजगार आणि शिक्षणावर बोलण्याऐवजी आमदार जाती-धर्माच्या आधारावर भेदभाव पसरवत असून हे संविधानाच्या मूल्यांच्या विरोधात असल्याचे संतप्त नेत्यांनी म्हटले.
अभय पाटील यांची भाषा ही लोकप्रतिनिधीला न शोभणारी असून त्यांनी सामाजिक सलोख्याला तडा देण्याचे काम केले आहे, अशा शब्दांत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला. लोकशाहीतील सामाजिक जबाबदारी विसरून त्यांनी केलेल्या या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


Recent Comments