बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील मरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात झालेल्या बॉयलर स्फोटात ८ कामगारांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना योग्य भरपाई मिळावी, या मागणीसाठी कित्तूर कर्नाटक सेनेच्या वतीने कारखान्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.


कारखाना प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली २० लाख रुपयांची मदत अत्यंत अपुरी असल्याचे सांगत आंदोलकांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला. महागाईच्या काळात ही रक्कम कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी पुरेशी नसून प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांची चेष्टा केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मृत कामगारांच्या कुटुंबांना प्रत्येकी १ कोटी रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे. इतकी मोठी दुर्घटना होऊनही कारखान्याच्या मालकांनी अद्याप पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्याचे सौजन्य दाखवले नाही, अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
प्रशासनाने तात्काळ मदतीच्या रकमेत वाढ न केल्यास आगामी काळात अधिक तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा कित्तूर कर्नाटक सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे कारखाना परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


Recent Comments