देशाची भाषा आणि संस्कृती हा प्रत्येक नागरिकाचा अभिमान आहे. मात्र, लोकांचे मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न झाल्यास देशाची एकता टिकवणे कठीण होईल, असे प्रतिपादन नवी दिल्लीतील प्रसिद्ध कामगार नेत्या अमरजीत कौर यांनी केले. बेळगावच्या मराठा मंदिर येथे आयोजित ‘कृष्णा मेणसे पुरस्कार’ वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.


यावेळी कौर यांनी देशातील बेरोजगारीच्या भीषण समस्येवर चिंता व्यक्त केली. तरुण पिढी नोकरीविना त्रस्त असून सरकारने या गंभीर आव्हानांकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. दिवंगत कृष्णा मेणसे यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी, मेणसे हे एक निर्भीड आणि निष्ठावान झुंजार नेते होते, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला.

कार्यक्रमात कॉ. भालचंद्र कांगो यांनी सध्याच्या राजकारणावर टीका केली. महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी यांसारख्या मुख्य प्रश्नांना बगल देऊन केवळ जात-धर्माच्या नावावर राजकारण करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. या सोहळ्यात अमरजीत कौर आणि कुस्ती मार्गदर्शक मारुती घाडी यांना ‘कृष्णा मेणसे पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, ॲड. नागेश सातेरी, प्रकाश मरगाळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments