स्वामी विवेकानंदांच्या १६४ व्या जयंतीनिमित्त बेळगाव येथील रामकृष्ण मिशन आश्रमात सोमवारी ‘युवा संमेलन’ पार पडले.

यावेळी स्वामी मोक्षात्मानंद यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर टाळून ध्येयप्राप्तीसाठी स्वामीजींचे आदर्श अंगीकारण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ब्रह्मचर्य, ध्यान आणि उच्च विचारांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वामीजींनी अल्पायुष्यात केलेले कार्य जागतिक स्तरावर अजरामर आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांचे जीवन बदलले असून तरुणांनी सर्व व्यसनांपासून दूर राहून महापुरुषांचे विचार आत्मसात करावेत, असे त्यांनी म्हटले. खऱ्या शिक्षणाचा अर्थ केवळ गुण मिळवणे नसून विषयाचे आकलन करून घेणे हा आहे, असे मत आयआयटी हैदराबादचे माजी प्राध्यापक डॉ. रवींद्र गुरुवण्णवर यांनी व्यक्त केले.
धारवाड येथील वंदे मातरम गुरुकुलचे संस्थापक मधुसूदन यांनीही यावेळी युवकांना मार्गदर्शन केले. स्वामीजींचा एक विचार जरी आयुष्यात उतरवला तरी जीवन सार्थकी लागेल, असे त्यांनी सांगितले. प्रा. उदय पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या संमेलनाला बेळगावमधील विविध महाविद्यालयांचे सुमारे ६०० विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments