BENGALURU

किनारपट्टी भागातील पर्यटन विकासासाठी सरकारचे पूर्ण सहकार्य : मंत्री हेब्बाळकर

Share

परराज्य आणि परदेशात आपले साम्राज्य निर्माण केलेले किनारपट्टी भागातील उद्योजक आता आपल्या मायभूमीकडे वळत आहेत. अशा उद्योजकांना राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री तथा उडुपी जिल्ह्याच्या पालकमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

मंगळुरू येथील एका खासगी हॉटेलमध्ये पर्यटन विभाग आणि दक्षिण कन्नड, उडुपी व उत्तर कन्नड जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘किनारपट्टी कर्नाटक पर्यटन परिषद’ पार पडली. या परिषदेत मार्गदर्शन करताना त्यांनी आगामी काळात कर्नाटकची किनारपट्टी जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे आभार मानले. किनारपट्टीच्या विकासासाठी सरकारने घेतलेला पुढाकार हा इतिहास घडवण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकारच्या एका हाकेवर तीनही जिल्ह्यांतील उद्योजक एकत्र आले आहेत, यावरून त्यांचे आपल्या जन्मभूमीवरील प्रेम दिसून येते. बेळगाव आणि उडुपीमध्ये भौगोलिक अंतर असले तरी उडुपी जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम करताना मला या भागाबद्दल विशेष जिव्हाळा निर्माण झाला आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

उत्तर कर्नाटकातील अनेक नागरिक शिक्षण आणि पर्यटनासाठी किनारपट्टी भागाला पसंती देत आहेत. पर्यटन विकासातील मुख्य अडथळा असलेल्या ‘सीआरझेड’ क्लिअरन्सबाबत आमचे सरकार सकारात्मक निर्णय घेईल. या तीनही जिल्ह्यांचा विकास करून कर्नाटक राज्याला मोठी आर्थिक शक्ती मिळवून देऊया, असे आवाहन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर, पर्यटन मंत्री एच. के. पाटील, मंत्री दिनेश गुंडूराव, मंत्री मंकाळ वैद्य, आमदार सतीश सैल, गुर्मे सुरेश शेट्टी, तसेच वरिष्ठ अधिकारी आणि विविध महामंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते.

Tags: