बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सांडपाणी वाहिनीच्या कामांसाठी निधी देताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप करत दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

आज बेळगाव महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, महापालिका सदस्य जेव्हा एखाद्या कामाची माहिती मागण्यासाठी पत्र लिहितात, तेव्हा अधिकाऱ्यांकडून त्याचे उत्तर मिळत नाही. अधिकाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे लोकप्रतिनिधींना कामात अडथळे येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवचरित्र उद्यानाजवळ बंद करण्यात आलेल्या रस्त्याबाबत तो एका बाजूने सुरू करून लोकांची सोय करावी, यासाठी महापालिकेने विशेष समिती स्थापन करून अहवाल सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली. एनजीटी योजनेचा निधी वाटप करताना उत्तर आणि दक्षिण बेळगावला समान किंवा योग्य प्रमाणात निधी न देता सरकारला चुकीची माहिती देण्यात आली आहे, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी निधीचे वाटप योग्य पद्धतीने झाले नसून अधिकाऱ्यांनी यामध्ये मनमानी केली आहे. सरकारची दिशाभूल करून विकासकामात भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि कामांचे वाटप समप्रमाणात व्हावे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
या सभेत विविध प्रभागांतील सदस्यांनी नागरी समस्या मांडल्या असून अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या पत्रांची दखल घेऊन त्यांना योग्य प्रतिसाद द्यावा, अशी सूचनाही आमदारांनी यावेळी केली.


Recent Comments