Belagavi

कणबर्गीतील उद्योजकांचे बेळगाव महानगरपालिकेला अल्टीमेटम

Share

महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात नसूनही काकती आणि कंग्राळी औद्योगिक वसाहतींना ई-प्रॉपर्टी कागदपत्रे दिली जातात, मग कणबर्गीतील उद्योजकांना का नाकारली जात आहेत, असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला आहे. आठवड्याभरात ही समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कणबर्गीतील उद्योजकांनी दिला आहे.

या संदर्भात कणबर्गीतील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने आज बेळगावचे महापौर आणि महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

संपूर्ण कर्नाटकात औद्योगिक क्षेत्रांना ई-प्रॉपर्टी कागदपत्रे मिळण्यास अडचणी येत आहेत. यामुळे बँकांकडून कर्ज घेऊन उद्योग वाढवणे कठीण झाले आहे. महानगरपालिकेच्या सभेतही यावर गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असे मुख्तार पठाण यांनी म्हटले आहे.

केआयएडीबीचे क्षेत्र महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. मात्र, काकती आणि कंग्राळी येथील उद्योगांना जर ही कागदपत्रे दिली जाऊ शकतात, तर कणबर्गीवरच अन्याय का केला जात आहे, अशी विचारणा उद्योजक सुरेश यादव यांनी केली आहे. सात दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी कणबर्गी औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: