शुक्रवारी बेळगाव मधील सर्किट हाऊसमध्ये आमदार शशिकला जोल्ले यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी २०४७ मध्ये स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण होताना ‘विकसित भारत’ निर्माण करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवल्याचे नमूद केले.

ग्रामीण भागाचा विकास म्हणजेच देशाचा विकास हे महात्मा गांधींचे स्वप्न मोदी सरकार प्रत्यक्ष साकारत आहे. शेतकरी कुटुंबांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर केली आहेत. पूर्वीची ‘मनरेगा’ योजना आता ‘विकसित भारत गॅरंटी योजना’ म्हणून नव्या दमाने आणि मजबूत पायावर लागू करण्यात आली असून यामध्ये अनेक सकारात्मक बदल करण्यात आल्याचे शशिकला जोल्ले यांनी स्पष्ट केले.
रोजगार हमी योजनेत पूर्वी १०० दिवस काम मिळत होते, त्यात आता २५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मजुरीच्या दरातही ३७५ रुपयांची वाढ करण्यात आली असून पूर्वी मजुरी मिळण्यास तीन महिने लागायचे, मात्र आता तंत्रज्ञानाच्या वापरामुळे १० दिवसांच्या आत थेट खात्यात पैसे जमा होत आहेत. भ्रष्टाचार रोखण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला असून यामध्ये महिला, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांना विशेष प्राधान्य दिल्याचे शशिकला जोल्ले यांनी सांगितले.
२०१४ पूर्वी या योजनेसाठी ८.५३ लाख कोटी रुपये दिले जात होते, आता हा निधी ८.६२ लाख कोटींपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागात अधिक विकासकामे होत असल्याची माहिती शशिकला जोल्ले यांनी दिली. याचवेळी भाजप प्रवक्ते एम. बी. झिरली यांनीही काँग्रेसवर टीका केली. २०११ मध्ये यूपीए सरकारने बजेटमध्ये कपात केली होती आणि या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा कॅगचा अहवाल होता, असे एम. बी. झिरली यांनी म्हटले आहे.
नव्या योजनेमुळे ग्रामीण भागातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, तसेच महिला आणि युवकांचा सहभाग वाढेल. शेतकऱ्यांना जलसिंचनाच्या सोयी करून घेण्यास या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेला विरोध करणाऱ्या कर्नाटक काँग्रेस सरकारचे आरोप बिनबुडाचे आहेत, अशा शब्दांत शशिकला जोल्ले यांनी नाराजी व्यक्त केली.


Recent Comments