“प्रल्हाद जोशी यांना दुसरे काही काम उरलेले नाही. त्यांच्या स्वतःच्या पक्षातच सध्या ‘गाढव’ पडले आहे, आधी त्यांनी ते निस्तरावे. राज्यात भाजप आज छिन्नविच्छिन्न झाली आहे,” अशा शब्दांत कन्नड आणि संस्कृती मंत्री शिवराज तंगडगी यांनी केंद्रावर टीका केली आहे.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि भाजपवर मंत्री शिवराज तंगडगी यांनी जोरदार हल्लाबोल केला. नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून जोशी यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना टांगडगी म्हणाले की, भाजपला गांधी घराण्याची भीती वाटत असल्यानेच ते वारंवार टीका करत आहेत. भाजप केवळ सुडाचे राजकारण करत असून देशासाठी त्यांचे योगदान शून्य आहे. काँग्रेसने सुरू केलेल्या योजनांची नावे बदलणे हीच त्यांची एकमेव उपलब्धी आहे, असा टोला शिवराज तंगडगी यांनी लगावला.
मनरेगा योजनेचे नाव बदलून उद्योगपतींचा फायदा करून दिला जात असून देशातील जनतेची फसवणूक सुरू आहे. यावरून भाजपला महात्मा गांधीजींबद्दल किती आदर आहे हे जगाला दिसून येते, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवराज तंगडगी यांनी व्यक्त केली.
क्रांतीवीर सांगोळी रायण्णा यांची वीरभूमी असलेल्या नंदगड येथील विकासकामे पूर्ण झाली आहेत. येत्या १९ जानेवारी रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते या कामांचे लोकार्पण होणार असून, त्या पार्श्वभूमीवर आज पाहणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे माजी मुख्यमंत्री देवराज अर्स यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे असून ते राज्याचे आदर्श मुख्यमंत्री आहेत, असे गौरवद्गार शिवराज तंगडगी यांनी काढले.
केरळ सरकारच्या नवीन विधेयकामुळे कासारगोड सीमाभागातील नागरिकांना त्रास होणार असून, राज्यपालांनी कर्नाटक आणि केरळ या दोन्ही राज्यांचे मत जाणून घेणे गरजेचे आहे. केरळच्या राज्यपालांनी या विधेयकाला मंजुरी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा अप्रस्तुत असून केवळ विकासावर चर्चा व्हावी, अशा शब्दांत शिवराज तंगडगी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.


Recent Comments