बळ्ळारी येथे द्वेषाच्या आणि सुडाच्या राजकारणातून एका निष्पाप काँग्रेस कार्यकर्त्याचा बळी गेल्याचे सत्यशोधन समितीच्या अहवालातून समोर आले आहे. गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष एच. एम. रेवण्णा यांनी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना हा खळबळजनक आरोप केला आहे.

बळ्ळारी जिल्ह्यावर शेजारील आंध्र प्रदेशचा प्रभाव असून वाल्मिकी मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे बॅनर लावण्यावरून झालेल्या वादात काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. हे सर्व फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट होईलच, मात्र जनार्दन रेड्डी आणि बी. श्रीरामुलू करत असलेले आरोप पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. संबंधित व्यक्तींनी खासगी सुरक्षारक्षक कशासाठी ठेवले होते आणि हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे, असे एच. एम. रेवण्णा यांनी म्हटले आहे.
बळ्ळारीतील या वादाच्या घटनेत माजी मंत्री जनार्दन रेड्डी आणि बी. श्रीरामुलू यांनी राजकारण करणे चुकीचे आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून गोळीबार नेमका कोणी केला, हे तपासातून लवकरच स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया एच. एम. रेवण्णा यांनी व्यक्त केली.
राज्यात सध्या मुख्यमंत्री पद रिक्त नसून सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री म्हणून समर्थपणे काम करत आहेत. पक्षासाठी अनेक कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले असून सर्वजण हायकमांडच्या निर्णयाशी बांधील आहेत. हावेरी येथे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पदाबाबत केलेल्या विधानावर त्यांनाच विचारणे योग्य ठरेल, असे एच. एम. रेवण्णा यांनी म्हटले आहे.
राज्यात गॅरंटी योजना अत्यंत प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. गृहलक्ष्मी योजनेचे दोन महिन्यांचे पैसे जमा होणे बाकी आहे, हा तांत्रिक भाग वगळल्यास इतर सर्व योजना सुरळीत सुरू आहेत. भाजपने विनाकारण चुका शोधणे थांबवावे, अशा शब्दांत एच. एम. रेवण्णा यांनी नाराजी व्यक्त केली.


Recent Comments