न्यायालयाने आदेश देऊन वर्ष उलटले तरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा ९० लाख रुपयांहून अधिक मोबदला न दिल्याने, बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची सरकारी कार आज गुरुवारी न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आली.


बैलहोंगल तालुक्यातील कुलवल्ली गावातील २१ एकर जमिनीचे १९९२-९३ मध्ये सरकारने संपादन केले होते. या जमिनीवर सरकारी कार्यालये आणि पशुसंवर्धन विभागाच्या इमारती उभारून सर्व सोयीसुविधा निर्माण केल्या गेल्या. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या, त्यांना मोबदला मात्र मिळाला नाही.
जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली असता, प्रति एकर ४ लाख रुपये मोबदला देण्याचे आदेश बैलहोंगल न्यायालयाने दिले होते. या आदेशाला सहा वर्षे उलटूनही प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नाही. अखेर थकलेला ९० लाखांचा मोबदला वसूल करण्यासाठी जिल्हा पंचायत सीईओंची गाडी जप्त करण्याची नामुष्की ओढवली.
सरकारी वकील मीसाळे यांनी सांगितले की, केवळ गाडीच नव्हे तर जिल्हा पंचायत कार्यालयातील संगणक आणि इतर फर्निचर देखील जप्त करण्याचे आदेश आहेत. मोबदला न मिळाल्यास पुढील जप्तीची प्रक्रिया राबवली जाईल.
बाधित शेतकरी महेंद्र रावसाहेब देसाई यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, १९८९ मध्ये जमीन संपादित करूनही आजही आम्ही न्यायासाठी वणवण फिरत आहोत. ५ एकर जमिनीचा मोबदला देण्याचे स्पष्ट आदेश असूनही प्रशासन टाळाटाळ करत आहे.


Recent Comments