Belagavi

रामतीर्थनगरमधील उद्यानांच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

Share

रामतीर्थनगरमधील उद्यानांच्या समस्यांची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी रहिवाशांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून सकारात्मक प्रतिसाद दिला. रामतीर्थनगर हे बूडाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, प्रलंबित रस्ते, गटारी आणि उद्यानांची स्थिती सुधारण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार आसिफ सेठ यांच्यासह बुडा आणि महानगरपालिका आयुक्तांनाही विकासासाठी निवेदन देण्यात आले. रामतीर्थनगर माझ्याच मतदारसंघात येत असून तेथील जनतेच्या समस्या सोडवणे ही माझी प्राथमिकता आहे, असे आमदार आसिफ शेठ यांनी म्हटले. तसेच परिसरातील अडचणी जाणून घेण्यासाठी शनिवारी आपण स्वतः भेट देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी माजी महापौर एन. बी. निर्वाणी, वीरनगौडा ईश्वरप्पागोळ, बाळप्पा समसुद्दी, बसवराज वाली, मल्लिकार्जुन हित्तलमनी, महांतेश कुलकर्णी यांच्यासह रामतीर्थनगरमधील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: