Belagavi

बेळगावच्या चिंतामणराव शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात

Share

बेळगावच्या चिंतामणराव शाळेचा शताब्दी महोत्सव माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. आमदार अभय पाटील यांच्यासह परदेशातील उद्योजक आणि उच्च पदस्थांनी शालेय गणवेश घालून, सायकलवरून येत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या कल्पक नेतृत्वाखाली हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार अभय पाटील यांनी स्वतः शालेय गणवेश परिधान करून मित्रांसोबत सायकल चालवत शाळेचा रस्ता धरला. वाटेत नार्वेकर गल्लीतील जुन्या परिचयाच्या दुकानात थांबून त्यांनी जुनी नाणी देऊन मित्रांसाठी चॉकलेट आणि सुपारी खरेदी केली, ज्यामुळे त्यांच्या बालपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

यावेळी आमदार अभय पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, १९८५ मध्ये आम्ही शालेय शिक्षण पूर्ण केले. शाळेच्या दिवसात रवी यांचे दुकान सर्व विद्यार्थ्यांचे आवडते होते. आज पुन्हा तिथे भेट देऊन जुन्या नाण्यांनी खरेदी करताना बालपणीचा तो काळ डोळ्यांसमोर उभा राहिला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आमदारांसह त्यांचे मित्र सरस्वती शाळा रोड, खडे बाजार आणि मीरापूर गल्लीमार्गे सायकलवरून शाळेत पोहोचले. जर्मनीहून आलेले माजी विद्यार्थी चंद्रशेखर हिरेमठ यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला आमचे बालपण पुन्हा मिळाल्याचा आनंद होत आहे, अशा शब्दांत त्यांनी समाधान व्यक्त केले. २५ वर्षांनंतर पुन्हा गणवेश घालून मित्रांना भेटल्याने घर विसरल्यासारखे वाटत असल्याचे माजी विद्यार्थी श्याम सुतार यांनी सांगितले.

शाळेत पोहोचल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी प्रार्थनेला हजेरी लावली आणि राष्ट्रगीत गायले. बेल वाजताच सर्वजण आपापल्या वर्गात गेले आणि शिक्षकांचे स्वागत ‘नमस्ते टीचर’ म्हणत केले. निवृत्त शिक्षिका नीलगंगा चरंतीमठ यांनी हजेरी घेऊन वर्गाला सुरुवात केली. असा अनुभव आणि बालपण कितीही कोटी रुपये खर्च केले तरी परत मिळणार नाही, असे सांगताना आमदार अभय पाटील भावूक झाले होते.

Tags: