गोकाक शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः शहरातील सतीश नगर, टिपू नगर आणि श्रीनगर यांसारख्या गजबजलेल्या वस्त्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्याने रहिवासी धास्तावले आहेत.

रात्रीच्या वेळी सक्रिय असलेल्या चोरट्यांच्या टोळ्यांनी आता कुलूपबंद घरांना आपले लक्ष्य बनवले आहे. चोरट्यांची ही टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असली, तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. घराला कुलूप लावून बाहेरगावी जायचे म्हटले तरी आता चोरीच्या भीतीने नागरिकांना घरातच थांबावे लागत आहे. प्रत्येक घरात कोणीतरी रखवालदार म्हणून राहण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे.
या वाढत्या गुन्हेगारीमुळे संताप व्यक्त करत, पोलीस विभागाने तात्काळ विशेष पथक तैनात करावे आणि रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील पुराव्यांच्या आधारे चोरट्यांच्या मुसक्या कधी आवळल्या जातात, याकडे संपूर्ण गोकाक शहराचे लक्ष लागले आहे.


Recent Comments