Belagavi

प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या अनगोळ शाखेत जागतिक ध्यान दिन उत्साहात संपन्न

Share

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या अनगोळ शाखेत जागतिक ध्यान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी ध्यानाचे महत्त्व विशद करत आध्यात्मिक जीवनशैलीचा पुरस्कार केला. समाजातील वाढता मानसिक तणाव कमी करण्यासाठी राजयोग ध्यान हाच प्रभावी मार्ग असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन निवृत्त न्यायमूर्ती ए. एस. पश्चापुरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी ध्यानामुळे व्यक्तीच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल होऊन संबंधांमध्ये सुधारणा होते, असे स्पष्ट केले.

वर्तमानातील धावपळीच्या युगात ध्यानाच्या अभावामुळेच मानसिक क्लेश वाढत असल्याची प्रतिक्रिया छाया शिंदे यांनी दिली. पालकांनी पाल्यांच्या हातात मोबाईल देण्याऐवजी त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

राजयोगिनी बी. के. अंबिका यांनी जागतिक ध्यान दिनाचे महत्त्व अधोरेखित करताना राजयोगामुळे व्यक्ती आणि समाज दोन्हींवर सकारात्मक परिणाम होतात, असे सांगितले.

राजयोगिनी बी. के. विद्या यांनी कार्यक्रमाचे स्वागत आणि सूत्रसंचालन केले. या सोहळ्याला बी. के. महादेव, बी. के. सुलोना, बी. के. मीनाक्षी यांच्यासह अनेक साधक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: