“केंद्र सरकार केवळ नरेगा योजनेतून महात्मा गांधींचे नाव हटवत नाहीये, तर गांधीजींच्या मूळ विचारधारेलाच संपवण्याचे काम करत आहे. भाजपचे धोरण म्हणजे ‘मुंह में राम आणि बगल में नथुराम’ असे आहे,” अशा तिखट शब्दांत एआयसीसी प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

बेळगाव येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोंढे पुढे म्हणाले की, “संविधानाच्या कलम २१ नुसार कामाचा हक्क देणाऱ्या ‘महात्मा गांधी रोजगार हमी योजने’चे स्वरूप केंद्र सरकार बदलत आहे. देशातील २७ कोटी मजुरांपैकी अनेक मजूरांचे नाव केवळ ‘आधार लिंक’ नाही या तांत्रिक कारणास्तव काढून टाकण्यात आले आहे. मनरेगामधून गांधीजींचे नाव आणि विचार दोन्ही पुसून टाकण्याचे षडयंत्र मोदी सरकार रचत आहे. या अन्यायाविरुद्ध आम्ही तीव्र लढा देऊ.”
मनरेगा ही केवळ रोजगार देणारी योजना नसून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करणारी योजना आहे. “कर्नाटकला हक्काचा जीएसटीचा वाटा दिला जात नाहीये आणि मनरेगाचे १४०० कोटी रुपयांचे थकबाकी देखील केंद्र सरकारने रोखून धरली आहे. मोदी सरकार जाणीवपूर्वक राज्य सरकारला त्रास देत असून गरिबांच्या योजना बंद करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करत आहे,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
या पत्रकार परिषदेला एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर, ‘बुडा’ अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हा गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष विनय नावलगट्टी, बसवराज शेगांवी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments