“मुख्यमंत्री हे निव्वळ लबाड असून त्यांनी सभागृहात दिलेली सर्व माहिती खोटी आहे, काँग्रेस पक्ष म्हणजे लबाडांचे घर आहे,” अशा जळजळीत शब्दांत विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी आपली नाराजी व्यक्त केली. उत्तर कर्नाटकच्या विकासाबाबत सरकारने कोणतीही ठोस घोषणा किंवा निधी न दिल्याने या भागातील जनतेचा मोठा विश्वासघात झाला असल्याची टीका त्यांनी केली.

अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच आम्ही उत्तर कर्नाटकच्या प्रश्नांवर चर्चेची मागणी केली होती आणि त्यानुसार २१ तास चर्चाही झाली, मात्र या चर्चेचे फलित म्हणजे ‘मुसळ केरात’ गेल्यासारखे आहे, असे आर. अशोक यांनी म्हटले. १६ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या सिद्धरामय्या यांनीच आता उत्तर कर्नाटकवर अन्याय झाल्याचे कबूल करणे, हे त्यांच्या प्रशासकीय अपयशाचे लक्षण आहे. सवदत्ती यल्लम्मा क्षेत्राचा विकास असो वा शहरातील तलावांचे पुनरुज्जीवन, कोणत्याही मंजूर योजनांची अंमलबजावणी करण्याची या सरकारची पात्रता नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यातील गृहलक्ष्मी योजनेचे ५ हजार कोटी रुपये कुठे गेले, असा सवाल विचारला असता सरकार ते शोधत असल्याचे सांगते, हे दुर्दैवी आहे. हे सरकार केवळ कर्जबाजारी आणि भ्रष्ट असून मुख्यमंत्र्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी केवळ स्वतःचे राजकीय स्थान मजबूत करण्यासाठी या अधिवेशनाचा वापर केला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


Recent Comments