Belagavi

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हलगा गाव बनले ‘डिजिटल फ्री’

Share

डिजिटल व्यसनाधीनतेला आळा घालून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी बेळगाव तालुक्यातील हलगा ग्रामपंचायतीने गावातील सर्व घरांमध्ये दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत टीव्ही आणि मोबाईल वापर बंद ठेवण्याचा स्तुत्य निर्णय घेतला असून, नुकतीच याची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

या उपक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायतीसमोर बसवण्यात आलेल्या भोंग्याचे बटन दाबून करण्यात आले. यानुसार दररोज सायंकाळी ठीक ७ वाजता आणि रात्री ९ वाजता भोंगा वाजवला जाणार असून, भोंगा वाजताच गावकऱ्यांनी टीव्ही व मोबाईल बंद ठेवायचे आहेत. निवृत्त शिक्षक बी. एच. बेळगोजी यांनी यावेळी सांगितले की, पालकांनी या वेळेत मुलांचा अभ्यास घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते चारुकिर्ती सैबन्नावर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष गणपत मारीहाळकर, अनिल शिंदे यांच्यासह मराठी व कानडी शाळेचे विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हलगा गावाने या उपक्रमाची प्रेरणा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील ‘अग्रण धुळगाव’ येथील यशस्वी प्रयोगातून घेतली आहे. तेथील यशस्वी प्रयोगाचे जिल्हाधिकारी काकडे यांनीही कौतुक केले होते.

या दोन तासांच्या कालावधीत विद्यार्थी अभ्यास करतील, तर कुटुंबातील सदस्य एकमेकांशी संवाद साधतील, वाचन करतील किंवा घरकामात वेळ घालवतील, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे. बेळगाव परिसरात असा निर्णय घेणारे हलगा हे पहिलेच गाव ठरले असून, हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Tags: