समाज कल्याण विभागाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते चलुवादी नारायणस्वामी यांनी केला आहे.

सुवर्णसौध येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, समाज कल्याण विभागाने १६ विविध कार्यक्रमांसाठी ३८ कोटी रुपये मंजूर केले होते, ज्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. केवळ ‘संविधान जागृती जत्था’ या नावाखाली १७ कोटी रुपये उधळले गेले असून, कमिशनच्या हव्यासापोटी बोगस कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. मंत्र्यांचे कुटुंबीयच इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांच्या माध्यमातून पैसे हडप करत असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.
सरकारच्या गॅरंटी योजनांवर टीका करताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या गॅरंटी योजना म्हणजे केवळ चोरीचे वाममार्ग आहेत. ‘गृहलक्ष्मी’ योजनेतील ५ हजार कोटी रुपये बेपत्ता आहेत, तर बीपीएल कार्डे रद्द करून ‘अन्नभाग्य’ योजनेवर डल्ला मारला जात आहे. तांदूळ काळ्या बाजारात विकला जात असून, कोणताही उपयोग नसलेल्या गॅरंटी अंमलबजावणी समित्या सरकारने तात्काळ बरखास्त कराव्यात.
बेळगाव अधिवेशनादरम्यान झालेल्या निवासव्यवस्थेबाबतही त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “राजशिष्टाचारानुसार विरोधी पक्षनेत्यांना ‘सूट रूम’ मिळणे आवश्यक होते, मात्र मला साधी ‘सिंगल रूम’ देण्यात आली. दुसरीकडे, अधिवेशनाशी कोणताही संबंध नसलेल्या गॅरंटी समितीच्या उपाध्यक्षांना मात्र सूट रूम देऊन सरकारने आपली मर्यादा ओलांडली आहे. आम्हाला आमच्या निवासासाठीही लढा द्यावा लागत आहे, अशी वाईट स्थिती कधीच नव्हती,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.


Recent Comments