Belagavi

आमच्या डिनर मीटिंगची विरोधकांना एवढी चिंता का? सलीम अहमद यांचा सवाल

Share

बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषद सदस्य सलीम अहमद यांनी विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या मेजवानीच्या कार्यक्रमावरून विरोधकांनी इतका गोंधळ घालण्याचे कारण काय, असा सवाल करत त्यांनी विरोधकांनाही या जेवणाचे उघड आमंत्रण दिले आहे.

सुवर्णसौध परिसरात माध्यमांशी बोलताना सलीम अहमद यांनी भाजपवर जोरदार टीका केली. गेल्या दहा दिवसांपासून विरोधक केवळ जेवण आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणावर बोलून सभागृहाचा वेळ वाया घालवत असल्याचे त्यांनी म्हटले. द्वेषपूर्ण भाषणांना प्रतिबंध करणारे विधेयक आम्ही मांडत आहोत, त्यावर चर्चा करण्याऐवजी विरोधक केवळ आरोपबाजीत मग्न आहेत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

उत्तर कर्नाटकच्या विकासाबाबत मुख्यमंत्र्यांना रस नसल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. सरकारने अर्थसंकल्पात या भागासाठी भरीव निधीची तरतूद केली असून ‘सर्वांना समान वाटा आणि समान जीवन’ या तत्त्वावर आमचे सरकार काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.

भाजप नेते छलवादी नारायणस्वामी यांनी राज्य सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनाही त्यांनी आव्हान दिले. सरकार प्रत्येक रुपयाचा हिशोब देण्यास तयार असून, आरोप करणाऱ्यांनी पुराव्यानिशी बोलावे, केवळ हवेत गोळीबार करू नये, अशा शब्दांत सलीम अहमद यांनी त्यांना सुनावले.

Tags: