गृहलक्ष्मी योजनेच्या ५ हजार कोटी रुपयांच्या निधीवरून सुरू असलेल्या वादावर मंत्री शिवानंद पाटील यांनी बेळगाव येथे कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

बेळगावच्या सुवर्णसौध येथे माध्यमांशी बोलताना शिवानंद पाटील यांनी निधीच्या गैरवापराचे सर्व आरोप फेटाळून लावले. सरकारकडे हा पैसा सुरक्षित असून तो लाभार्थ्यांच्या हक्काचा आहे, असे त्यांनी नमूद केले. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणणाऱ्या भाजपने आम्हाला सल्ले देऊ नयेत, आम्ही दिलेली आश्वासने पाळत आहोत, असा टोला शिवानंद पाटील यांनी लगावला.

गेल्या १२ महिन्यांत कोणतीही अडचण आली नाही, आता केवळ दोन महिन्यांचा तांत्रिक प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधक या विषयाचे विनाकारण भांडवल करत असून हे सर्व राजकारण असल्याचे शिवानंद पाटील यांनी म्हटले. सरकारी प्रक्रियेमुळे थोडा विलंब झाला असला तरी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने ते अशा अफवा पसरवत असल्याची टीका त्यांनी केली. जनतेने अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिवानंद पाटील यांनी केले. राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असून गॅरंटी योजना यशस्वीपणे सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments