सिद्धरामय्या ‘आउटगोइंग’ मुख्यमंत्री असतील तर बी.वाय. विजयेंद्र काय ‘इनकमिंग’ मुख्यमंत्री आहेत का, असा सवाल नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांनी उपस्थित केला आहे. विजयेंद्र हे भविष्य सांगणारे ज्योतिषी आहेत का, असा टोला लगावत त्यांनी भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर निशाणा साधला.

बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना भैरती सुरेश यांनी भाजप नेत्यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. दुसऱ्यांच्या कामात चुका शोधण्यापूर्वी भाजपने स्वतःच्या कारभाराकडे लक्ष द्यावे, अशी टीका त्यांनी केली. गृहलक्ष्मी योजनेचा कोणताही निधी गहाळ झालेला नसून तो सरकारी तिजोरीत सुरक्षित आहे, असे भैरती सुरेश यांनी स्पष्ट केले. आर. अशोक आणि भाजपचे इतर नेते नेहमीच खोटे बोलून जनतेची दिशाभूल करतात, असा आरोप त्यांनी केला.

धर्मस्थळ प्रकरणाबाबत बोलताना स्नेहमयी कृष्णा यांच्याकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे भैरती सुरेश यांनी नमूद केले. ज्यांना तक्रार आहे त्यांनी कायदेशीर लढाई लढावी, या देशात न्यायव्यवस्था अजून जिवंत आहे आणि आमचा त्यावर पूर्ण विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या हे प्रकरण लोकप्रतिनिधींच्या न्यायालयात असून न्यायाधीश त्यावर योग्य तो निर्णय घेतील, असे भैरती सुरेश यांनी म्हटले.
आमचे सरकार कायद्याचे पालन करणारे असून कोणत्याही दबावाखाली येणार नाही, अशी प्रतिक्रिया भैरती सुरेश यांनी व्यक्त केली. विरोधकांनी केवळ राजकारणासाठी बिनबुडाचे आरोप करणे थांबवावे, अशा शब्दांत भैरती सुरेश यांनी आपली नाराजी व्यक्त केली. सरकार आपली जबाबदारी पार पाडत असून जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.


Recent Comments