Belagavi

गृहलक्ष्मी योजनेच्या गोंधळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन

Share

गृहलक्ष्मी योजनेचे हप्ते न दिल्याने महिलांची फसवणूक झाली असून, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर सभागृहात न येता गायब झाल्या आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केली. या टीकेला उत्तर देताना, दिलेला शब्द फिरवणे ही भाजपची पद्धत आहे, आमची नाही, अशा शब्दांत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पलटवार केला.

गृहलक्ष्मी योजनेचे दोन महिन्यांचे हप्ते थकले असून मंत्री सभागृहात खोटी माहिती देत असल्याचा आरोप आर. अशोक यांनी केला. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि मंत्र्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. मंत्री सभागृहात येत नसल्याने त्या काय चंद्रलोकावर गेल्या आहेत का, असा खोचक सवाल त्यांनी यावेळी विचारला.

आर. अशोक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपण कुठेही गायब झालो नसल्याचे स्पष्ट केले. दिलेला शब्द पाळणे ही काँग्रेसची संस्कृती असून आम्ही भाजपसारखे खोटे बोलत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ही काँग्रेसची गॅरंटी असून भाजपची फसवणूक नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

योजनेच्या अंमलबजावणीबाबत आपण सभागृहात स्पष्ट माहिती दिली असून आतापर्यंत २३ हप्ते जमा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. भाजप नेते विनाकारण गोंधळ घालत असून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Tags: