मुख्यमंत्री पदावरून सिद्धरामय्या यांना हटवल्यास त्या पदावर दलित समाजातील नेत्याची नियुक्ती करावी, अशी नवी मागणी वाल्मिकी पीठाचे प्रसन्ननानंद स्वामीजी यांनी केली आहे.

राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जोर धरला असतानाच, वाल्मिकी पीठाचे प्रसन्ननानंद स्वामीजी यांनी बेळगाव येथे हे महत्त्वपूर्ण विधान करून एका नव्या चर्चेला सुरुवात केली आहे. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून पुढे काम करण्यास आपल्या समाजाचा कोणताही आक्षेप नाही, असे स्वामीजींनी स्पष्ट केले. वाल्मिकी समाजाचे आमदार आणि संपूर्ण समाज सिद्धरामय्या यांच्या पाठिशी उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र, जर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदावरून बाजूला केल्यास, त्या जागेवर दलित समाजातील नेत्याची नियुक्ती करावी, अशी प्रबळ मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी पात्र असलेल्या दलित नेत्यांची नावेही पुढे केली. “आमच्या समाजात मल्लिकार्जुन खर्गे, जी. परमेश्वर, एच. सी. मुनियप्पा आणि सतीश जारकीहोळी यांच्यासारखे चार-पाच प्रमुख नेते आहेत. या चौघांपैकी कोणीही मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आनंद होईल. दलित समाजाला संधी देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करावा,” असा आग्रह प्रसन्ननानंद स्वामीजी यांनी केला. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांच्या दरम्यान, दलित नेतृत्वासाठी पीठाकडून आलेल्या या थेट मागणीमुळे काँग्रेसच्या राजकीय गोटात नवीन समीकरणे जुळायला लागली आहेत.


Recent Comments