Belagavi

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ २५ नोव्हेंबरला

Share

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ २५ नोव्हेंबर रोजी येथील सुवर्ण विधानसौधमध्ये आयोजित करण्यात येणार असून, विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन मान्यवरांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली जाईल, अशी माहिती राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी.एम. त्यागराज यांनी दिली.

सोमवारी बेळगावातील माहिती विभागात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पर्यावरण आणि ग्रामीण विकास समाजसेवेसाठी शिवाजी कणिकर, शिक्षण आणि समाजसेवेसाठी सुरेंद्र दोड्डण्णवर आणि साहित्य व समाजसेवेसाठी बसराज येलीगार यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या १४ व्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत भूषवतील. उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम. पी. सुधाकर यांचीही यावेळी उपस्थिती असेल. इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरणकुमार हे दीक्षांत भाषण देतील. यावेळी एकूण ३८,४८५ विद्यार्थी पदवीसाठी पात्र ठरले आहेत, ज्यात ३६,६४२ पदवीधर विद्यार्थी आणि १,८४३ पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी १२५ विद्यार्थ्यांनी रँक मिळवले आहेत.

राणी चन्नम्मा विद्यापीठाने गेल्या १८ महिन्यांत तीन दीक्षांत समारंभ आयोजित केले आहेत. विशेष म्हणजे, पदव्युत्तर परीक्षेचा निकाल लागल्यानंतर केवळ ५० दिवसांच्या आत दीक्षांत समारंभ आयोजित करणारे हे पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

या विद्यापीठाला मुंबई आयआयटीकडून ‘एमर्जिंग युनिव्हर्सिटी अवॉर्ड’ हा पुरस्कार मिळाला आहे. हिरेबागेवाडी येथे विद्यापीठाच्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम सुरू असून, पुढील वर्षापासून शैक्षणिक उपक्रम येथून चालवले जातील. विद्यापीठाने देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांशी करार केला आहे. शिक्षकांची कमतरता असली तरी, विद्यार्थ्यांना काळजी करण्याची गरज नाही; कारण ई-विद्यालयाद्वारे ४,४४६ विद्यार्थी आणि १.२० लाख विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेत आहेत. तसेच, ई-ऑफिस प्रणालीमुळे कामे विनाविलंब होत आहेत.

२०२४ मध्ये पंतप्रधान उच्च शिक्षण अभियान योजनेअंतर्गत संशोधन, प्रयोगशाळा आणि विद्यापीठाच्या विकासासाठी राणी चन्नम्मा विद्यापीठाला १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भूतरामहट्टी येथील ७२ एकर जमीन राणी चन्नम्मा विद्यापीठाला मिळावी, अशी विनंती करण्यात आली असून, याला सरकार आणि उच्च शिक्षण मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे कुलगुरूंनी सांगितले.

यावेळी संतोष कामगौडा, स्वप्ना, नदाफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: