उच्च न्यायालयाचा आदेश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावात हलगा-मच्छे बायपासचे बांधकाम पुन्हा सुरू झाले आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली. यावेळी, आपण विकासाचे विरोधक नसून, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच काम सुरू करावे; तोपर्यंत बांधकाम थांबवावे, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली.


उच्च न्यायालयाचा आदेश लागू झाल्यामुळे बेळगावात हलगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा सुरू झाले असून, आज जिल्हाधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी हे काम आम्हाला विश्वासात न घेता, अनाधिकृतपणे सुरू केले असल्यामुळे ते तात्काळ रद्द करावे, अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली.

जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली असता शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, अनाधिकृतपणे हलगा-मच्छे बायपासचे बांधकाम केले जात आहे. १९३० मध्ये कॅम्प परिसरातील फिश मार्केटमध्ये झीरो पॉइंट निश्चित करण्यात आला होता; पण आता तो अलारवाड येथे हलवण्यात आला आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत, न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत काम सुरू करू नये, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. त्यावर जिल्हाधिकारी उच्च न्यायालयाचा आदेश आल्याचे सांगत होते. या संदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल आणि हे बांधकाम रद्द करावे, अशी मागणी शेतकरी नेते राजू मरवे यांनी केली.

शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी यावेळी बोलताना, सुपीक शेतजमीन घेऊन दीड लाख शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचे काम सुरू आहे, असे मत व्यक्त केले. या भागात मराठी-कन्नड वाद निर्माण करून शेतकऱ्यांची हत्या करण्याचा कट रचला जात आहे. अधिवेशनाच्या काळात इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये, यासाठी जिल्हाधिकारी येथे आले आहेत. घटप्रभा डावा कालवा व उजवा कालवा बांधकामवेळी शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले असता, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे हे बायपासचे काम करावे. आम्ही विकासाचे विरोधक नाही, परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हे काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, २०११ मध्ये जे सर्वेक्षण योग्य झाले नव्हते, ते पुन्हा केले जाईल. येळ्ळूर-वडगाव-शहापूर रस्ते विकासकामादरम्यान पाणी शेतीत शिरणार नाही, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच, उच्च न्यायालयाच्या निकालानंतरच बायपास रस्ता बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र, याबाबत दिवाणी न्यायालयात केस प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. त्यासंबंधी योग्य कागदपत्रे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आणि ती त्यांना पुरवली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी येळ्ळूर-वडगाव पुलाला भेट दिली आणि बळ्ळारी नाल्याच्या सद्यस्थितीची पाहणी केली.
यावेळी रमाकांत कोंडूस्कर यांनी बळ्ळारी नाला अस्वच्छ झाला असून, त्यात गवत वाढल्याने त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे नाल्याची खोली वाढवून गाळ काढावा, अशी मागणी केली. याकरिता जिल्हा पालकमंत्र्यांनी विशेष निधी देण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शेतकरी नेते आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments