Belagavi

उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी आमदार, मंत्र्यांनी आवाज उठवावा : अशोक पुजारी

Share

हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकचे आमदार आणि मंत्री यांनी उत्तर कर्नाटकच्या सर्वांगीण विकासासाठी जोरदार आवाज उठवावा. जर सरकारकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही, तर स्वतंत्र राज्यासाठी संघर्ष अटळ आहे, असा इशारा उत्तर कर्नाटक लढा समितीचे प्रमुख अशोक पुजारी यांनी दिला.

उत्तर कर्नाटक लढा समितीचे प्रमुख अशोक पुजारी यांनी आज बेळगावमधील कन्नड साहित्य भवनात पत्रकार परिषदेत बोलताना, सुवर्णसौधमध्ये सचिव स्तरावरील कार्यालये त्वरित स्थलांतरित करून बेळगावला राज्याची दुसरी राजधानी घोषित करावी, तसेच उत्तर कर्नाटकच्या विकास योजनांना सरकारने त्वरित प्रतिसाद द्यावा, अशी मागणी केली. जर सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर येत्या नवीन वर्षापासून स्वतंत्र राजकीय शक्तीसह स्वतंत्र राज्यासाठी लढा उभारण्याची तयारी दर्शवण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

कागवाडचे आमदार राजू कागे यांनी स्वतंत्र राज्यासाठी लिहिलेल्या पत्राचे त्यांनी समर्थन केले. तसेच, विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी बेळगावमधील अधिवेशन हे ‘संघर्षाचे अधिवेशन’ असेल, असे केलेले वक्तव्य योग्यच असून, १० दिवसांच्या अधिवेशनादरम्यान शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणे अपरिहार्य असल्याचे त्यांनी नमूद केले. उत्तर कर्नाटकच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांनी या अधिवेशनात विकासासाठी ठामपणे आवाज उठवून अंतिम निर्णय घ्यावा; अन्यथा त्यांनी आंदोलनाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा अशोक पुजारी यांनी व्यक्त केली.

यावेळी उत्तर कर्नाटक भागातील इतर आंदोलक उपस्थित होते.

Tags: