
बेळगाव-खानापूर रस्त्याला जोडणाऱ्या जीआयटी कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या उद्यमबाग औद्योगिक वसाहतीकडे जाणारा प्रमुख रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करून त्याचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करावे, अशी जोरदार मागणी उद्योजकांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव-खानापूर रस्त्याला उद्यमबाग औद्योगिक वसाहतीशी जोडणाऱ्या जीआयटी कॉलेजच्या मागील मुख्य रस्त्याची दुरवस्था कायम आहे. वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होतो. यामुळे या मार्गावरील उद्योजक आणि कामगारांना तीव्र गैरसोयीचा आणि त्रासाचा सामना करावा लागत आहे. खड्डे आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून कामगारांना जीव धोक्यात घालून दुचाकी चालवावी लागत आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाळा संपल्यानंतर आता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ आणि मातीची समस्या वाढली आहे. उद्यमबाग येथे सतत ये-जा करणाऱ्या मालवाहू वाहनांच्या वाहतुकीमुळे तीव्र धूळयुक्त वातावरण तयार होत आहे. धूळीचे हे प्रमाण कार्यशाळा, कारखाने, कार्यालये, दुकाने आणि आजूबाजूच्या घरांमध्ये पसरत असल्यामुळे स्थानिक रहिवासी आणि कामगारांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत तयार होणाऱ्या अनेक उत्पादनांना भारतात आणि विदेशातही मोठी मागणी आहे. निर्यात केलेल्या उत्पादनांच्या संदर्भात जर्मनी, जपान, इंग्लंड, कोरियासारख्या विदेशी कंपन्यांचे उद्योजक आणि वरिष्ठ अधिकारी वारंवार उद्यमबागला भेट देतात. या अत्यंत खराब झालेल्या रस्त्यामुळे या परदेशी पाहुण्यांसमोर केवळ बेळगाव शहराचीच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या प्रतिष्ठेला धक्का लागत आहे, अशी खंत उद्योजकांनी व्यक्त केली.
त्यामुळे महापौर, स्थानिक लोकप्रतिनिधी, बेळगाव महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घ्यावी. सदर रस्त्याची युद्धपातळीवर तातडीने दुरुस्ती करून डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करावे, अशी एकमुखी मागणी उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील उद्योजक आणि कामगारांनी केली आहे.


Recent Comments