Belagavi

तृतीयपंथीयाच्या मारहाणप्रकरणी बेळगावात निषेध

Share

बेंगळुरू येथील बोम्मनहळ्ळीतील विराट नगर येथे एका तृतीयपंथीयाला विवस्त्र करून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा बेळगाव येथील तृतीयपंथीयांनी दिला आहे.

आज बेळगाव शहरात पत्रकार परिषद आयोजित करून तृतीयपंथीयांनी आपला संताप व्यक्त केला. तृतीयपंथीयांच्या एका टोळीने आपल्या साथीदारावर मनमानी पद्धतीने हल्ला करून दादागिरी केल्याची घटना बेंगळुरू येथील बोम्मनहळ्ळी विराट नगर येथे घडली होती.

आपले पथक सोडून दुसऱ्या गटात सामील झाल्याच्या रागातून प्रीती आणि चिन्नी नावाच्या तृतीयपंथीयांच्या टोळीने सुकन्या नामक तृतीयपंथीयाचे के.आर. पुरम येथून ऑटोमध्ये अपहरण केले आणि बोम्मनहळ्ळी येथे नेऊन तिला अमानुष मारहाण केली. सुकन्या विनवणी करत असतानाही हातातील वस्तूने तिला मारण्यात आले. मारहाणीचा व्हिडीओ कॉल व्हायरल झाल्यानंतर बोम्मनहळ्ळी पोलिसांनी स्वतःहून तक्रार नोंदवत सात तृतीयपंथीयांना अटक केली होती. या घटनेचा बेळगाव येथील तृतीयपंथीयांनी तीव्र निषेध केला आहे.

यावेळी बोलताना तृतीयपंथीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘आमच्या समुदायावर हल्ले वाढले असून, सुकन्यावरील हल्ल्यातील आरोपींना जामीन मिळाला आहे,’ तृतीयपंथीयांना दिलेले हक्क लागू होत नाहीत आणि आरक्षणाने नोकरीला गेल्यास निर्बंध लादले जातात. अशा गुन्हेगारी कृत्यांसाठी सरकार जबाबदार आहे. सुकन्याला न्याय न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला.”

या पत्रकार परिषदेत बेळगाव येथील तृतीयपंथी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: