Belagavi

बेळगावात संत कनकदास जयंती उत्साहात साजरी

Share

संत कनकदास यांनी समाजाला दिलेल्या संदेशाचे स्मरण करत, ‘जातीसाठी लढण्याऐवजी मानव धर्म जाणून जगा’ असे आवाहन बेळगाव ‘बुडा’ (BUDA) चे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केले. संत-दास यांनी देशाला आणि समाजाला जो संदेश दिला, तो आत्मसात करून जगणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि कन्नड व संस्कृती विभागाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कुमारगंधर्व कलामंदिर येथे दासश्रेष्ठ संत कनकदास जयंती उत्सवाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले की, १२ व्या शतकात जगज्योती बसवेश्वरांनी वचन क्रांती केली, त्यानंतर मनुष्य जातीला मानव धर्माची जाणीव झाली. मनुष्य म्हणून जन्म घेतलेल्या मानवाने मनुष्य म्हणूनच जगायला हवे. १५ व्या शतकात हरिदास क्रांती झाली. पुरंदर दास आणि कनकदास यांनी “कुळ-कुळ म्हणून भांडू नका” ( असा महत्त्वाचा संदेश दिला. तसेच, सिद्धरामय्या यांनी १९९२ साली पहिल्यांदा सार्वजनिक स्तरावर भक्त कनकदास जयंती उत्सव सुरू केला, असे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी महानगरपालिकेचे उपायुक्त उदयकुमार तळवार, राजशेखर तळवार, अशोक सदलगे, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहायक संचालिका विद्यावती भजंत्री, मल्लेश चौगले यांच्यासह कुरुब समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: