ऊस उत्पादकांना आधारभूत किंमत मिळावी, या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि ‘करवे’ (नारायणगौडा गट) यांच्या वतीने आज बेळगाव येथील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ऊस दरासाठी शेतकऱ्यांनी मध्यवर्ती बस स्थानकाजवळ रास्ता रोको आंदोलन केले. बेळगाव येथील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ रस्ता रोको करून शेतकरी संघटना आणि करवे (नारायणगौडा गट) यांच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली. बस स्थानकात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अडवले. याचवेळी शेतकरी आणि पोलीस यांच्यात शाब्दिक वाद झाला.
कर्नाटकातील ३१ जिल्ह्यांमधील विविध संघटनांनी ऊस उत्पादकांच्या या लढ्याला पाठिंबा दिला आहे. बेळगाव जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. याच पार्श्वभूमीवर काल बेळगावला आलेल्या साखर मंत्र्यांनी आणखी दोन दिवसांचा अवधी मागून, ‘साखर कारखाना मालकांना नुकसान होईल,’ असे उद्दाम उत्तर दिले आहे.”जर दर जाहीर केला नाही, तर राज्यात रक्तपात होईल,” असा गंभीर इशारा शेतकरी संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी दिला.
यावेळी करवेचे प्रमुख महांतेश रणगट्टीमठ बोलताना म्हणाले, “शेतकऱ्यांची ही क्रांती राज्यव्यापी होण्यापूर्वीच सरकारने सावध होऊन ₹३५०० आधारभूत किंमत तातडीने द्यावी. शेतकऱ्यांचा संयम आता संपत आला आहे. सरकारने २४ तासांत निर्णय न घेतल्यास, भविष्यात होणाऱ्या अराजकतेला सरकारच जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला.
शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे केएसआरटीसीच्या बस रस्त्यावरच थांबून राहिल्या. परिणामी याचा फटका सर्वसामान्य प्रवासी आणि विद्यार्थ्यांना बसला.


Recent Comments