बेळगाव जिल्ह्यात मूढलगी तालुक्यातील गुर्लापूर क्रॉस येथे ऊस दराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन आज आठव्या दिवशीही सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी गुर्लापूर येथे भेट दिली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

स्वामीजींनी यावेळी केंद्र व राज्य सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास सरकार महाअपराध करत असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला संबोधित करताना स्वामीजींनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. शेतकरी हा सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करणारा अन्नदाता आहे; अन्न नसेल तर एक दिवसही काढणे कठीण आहे. वीज सोडल्यावर पाणी भरायला जाणे, योग्य वेळी खत देणे यासाठी शेतकरी झटत असतो. मग, सर्व वस्तूंचे दर वाढत असताना शेतकऱ्याला आपल्या पिकांच्या दरांची पुनर्पाहणी करून घेण्याचा अधिकार नाही काय? निवडणुकीच्या वेळी हात जोडून ‘शेतकरी आपला कणा आहे’ असे म्हणता आणि नंतर मागून येऊन लाथ मारून त्यांची कंबर मोडता! शेतकरी स्वयंपूर्ण झाल्यास तो आपले ऐकणार नाही, अशी भीती सरकारला वाटते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
एखाद्या व्यक्तीसाठी रात्री-अपरात्री न्यायालय उघडले जाते, पण आठ दिवसांपासून रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्यांचा संघर्ष तुम्हाला दिसत नाही. शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलेले वस्तू मानले आहे, असे समजणे हा महाअपराध आहे. शेतकरी जे काही विकत घेऊ इच्छितो, त्यासाठी त्याला उसाला योग्य भाव मिळणे आवश्यक आहे. उद्योजकांचे नुकसान झाल्यास करामध्ये चढ-उतार करून संतुलन साधले जाते, मग शेतकऱ्यांवर संकट आल्यावर सरकार कर (टॅक्स) मध्ये बदल करून मदत का करत नाही? जेव्हा सर्व गोष्टी महाग होतात, तेव्हा शेतकरीच सर्वात स्वस्त होतो. भाजीपाला आणि उसाचे दर कधी पाडतील, हे सांगता येत नाही. आमचा माल घेणारे पैसे देत नाहीत, आणि आमचे पैसे मागितल्यावर सरकार ते मिळवून देत नाही, यामागे सरकारचे काही समझोता आहे का, असा सवाल स्वामीजींनी केला..


Recent Comments