बेळगाव जिल्ह्यातील बिजगर्णी-बेळवट्टी रस्त्यावरील कावळेवाडी क्रॉसजवळ झालेल्या भीषण अपघातात एका १८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

भरधाव वेगात येणाऱ्या एका कारने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात मृत तरुणीची आई आणि मामा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव रोहिणी रामलिंग चौगुले (१८) असून ती बेळवट्टी येथील रहिवासी आहे. तिची आई लक्ष्मी रामलिंग चौगुले (४५) आणि मामा सतीश विष्णू मोहिते (४०) (रा. तुडये, ता. चंदगड) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या रोहिणीला तात्काळ सिव्हिल रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. लक्ष्मी यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. ते तुडयेहून बेळवट्टीकडे जात असताना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
या प्रकरणी पोलिसांनी कारचालक जुनैद राजगोळी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक नागगौडा कट्टीमनिगौडर आणि त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत. रोहिणीच्या मृत्यूमुळे तिच्या आजी, आई आणि बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या संदर्भात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


Recent Comments