Belagavi

नागनूर रुद्राक्षी मठात २८ नोव्हेंबरपासून ‘अनुभव दर्शन’ प्रवचन

Share

नागनूर रुद्राक्षी मठाचे लिंगैक्य डॉ. शिवबसव महास्वामी यांच्या १३७ व्या जयंती महोत्सवानिमित्त २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान बेळगावातील शिवबसव नगर येथील आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या आवारात ‘अनुभव दर्शन’ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांनी ही माहिती दिली.

अथणी येथील बसवधामच्या बसवेश्वरी माताजी प्रवचन सादर करणार आहेत.

वचन ग्रंथांची मिरवणूक

डॉ. शिवबसव महास्वामी यांच्या जयंती महोत्सवानिमित्त २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्रीनगर उद्यानातून वचन ग्रंथांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत राज्यातील विविध मठांचे प्रमुख आणि हजारो भाविक सहभागी होणार आहेत.

यंदा जयंती महोत्सवानिमित्त २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान शहरातील विविध वसाहतींमधून भाविक गटागटाने भाकरीची शिदोरी घेऊन नागनूर रुद्राक्षी मठात दाखल होणार आहेत.

२९ नोव्हेंबर रोजी श्रीनगर उद्यान, रामतीर्थ नगर, कणबर्गी, केएचबी कॉलनी, बसवेश्वर वसाहत, खासबाग, हिंदवाडी, वडगाव, अनगोळ आणि शहापूर परिसरातून भाविक शिदोरी घेऊन मठात येणार आहेत.

३० नोव्हेंबर रोजी महांतेश नगर, शिवबसव नगर, श्रीनगर, चन्नम्मा सोसायटी, अशोक नगर आणि आंजनेय नगर येथील भाविक सहभागी होतील. १ डिसेंबर रोजी कुवेंपु नगर, कुमारस्वामी लेआउट, सदाशिव नगर, हनुमान नगर, संगमेश्वर नगर आणि सह्याद्री नगर येथून, तर २ डिसेंबर रोजी वैभव नगर, विद्यागिरी, बसव कॉलनी, शाहूनगर आणि अन्नपूर्णवाडी येथून भाविक शिदोरी घेऊन मठात येणार आहेत.

दररोज सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या प्रवचनात भाविक सहभागी होणार असल्याची माहिती डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Tags: