बेळगावात २७ ते २९ डिसेंबरदरम्यान सहावे राज्यस्तरीय विज्ञान संमेलन होणार आहे. त्याच्या तयारीचा आढावा मंत्री सतीश जारकीहोळी यांनी घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सरकारी आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना संमेलनात सहभागी करून घेण्याचे नियोजन करण्याची सूचना केली. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मोफत बसव्यवस्था करावी, तसेच खासगी शाळांनी स्वतःच्या वाहनांतून विद्यार्थ्यांना आणावे, असे त्यांनी सांगितले.


संमेलनस्थळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून पाण्याची गुणवत्ता तपासावी. सरकारी प्रदर्शनांसोबत वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या खासगी संस्थांनाही प्रदर्शनासाठी संधी द्यावी. संमेलनाध्यक्षांचे लोककला पथकांच्या माध्यमातून मिरवणुकीने स्वागत करण्याचे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संमेलनासाठी विविध समित्या स्थापन करून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले. ३० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण नियोजन तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच आपत्कालीन वैद्यकीय पथक आणि अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
राज्य वैज्ञानिक संशोधन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हुलिकल नटराज यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासा निर्माण करणे हा संमेलनाचा उद्देश असल्याचे सांगितले. २०२१ पासून राज्यातील विविध जिल्ह्यांत पाच संमेलने झाली असून, सहावे संमेलन बेळगावात आयोजित करण्यात येत आहे. ज्येष्ठ विधिज्ञ प्रा. रविवर्मा संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध चर्चासत्रांसह विज्ञान प्रदर्शन आणि फिरते तारांगण हे संमेलनाचे आकर्षण असणार आहे.
दरम्यान, मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नागरिकांच्या तक्रारी व अडचणींची निवेदने स्वीकारली.
बैठकीला आमदार आसिफ सेठ, पोलीस आयुक्त निकम प्रकाश अमृत, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा पंचायत प्रकल्प संचालक रवी बंगारप्पनवर, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments