ऊसाला प्रतिटन ४,५०० रुपये दर आणि प्रोत्साहनपर रक्कम देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदला बेळगावात अल्प प्रतिसाद मिळाला.

शहरातील बस, रिक्षा तसेच शाळा-महाविद्यालयांची वाहतूक नियमित सुरू होती. महाराष्ट्र आणि गोव्याला जोडणाऱ्या बससेवेसह बहुतांश दुकानेही सुरू होती. मध्यवर्ती बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी बस रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिवहन मंडळाने दुसऱ्या प्रवेशद्वारातून बससेवा सुरू ठेवली.


कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादकांनी मध्यवर्ती बसस्थानकावर आंदोलन केले. ऊसाला प्रतिटन ४,५०० रुपये दर निश्चित करावा आणि एसएपी प्रोत्साहनपर रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेस नेत्या आयेशा सनदी यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि सतीश जारकीहोळी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
रयत संघाचे प्रदेशाध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी आणि मानद अध्यक्ष शशिकांत गुरूजी यांच्या नेतृत्वाखालीही धरणे आंदोलन करण्यात आले. साखर कारखानदारांच्या बाजूने सरकार भूमिका घेत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मागण्या मान्य न झाल्यास जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.


Recent Comments