Belagavi

मुचंडी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची उपलोकायुक्तांकडून तपासणी

Share

राज्य लोकायुक्तांचे उपलोकायुक्त बी. वीरप्पा यांनी शनिवारी बेळगाव तालुक्यातील मुचंडी ग्रामपंचायतीला भेट देऊन कामकाजाची तपासणी केली.

यावेळी त्यांनी हजेरी पुस्तक, कर्मचाऱ्यांची माहिती, हालचाल नोंदवही, नागरिकांकडून प्राप्त अर्ज आणि त्यावरील कार्यवाही तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची पाहणी केली.

ग्रामपंचायत कार्यालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने नियमित हजेरी नोंदवणे तसेच कामकाजाच्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. हजेरी आणि हालचाल नोंदी योग्य पद्धतीने ठेवल्या नाहीत, तर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.

सांडपाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत हद्दीत आवश्यक त्या ठिकाणी शोषखड्डे बांधण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या कामांमध्ये अनुदानाचा गैरवापर किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गावात पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बंद पडलेल्या कूपनलिकांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

प्रत्यक्ष काम न करता निधी वितरित करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, लाभार्थी निवडीत गैरप्रकार करणे किंवा सरकारी निधीचा गैरवापर करणे असे प्रकार आढळल्यास ग्रामपंचायत विकास अधिकारी (पीडीओ) यांच्यासह दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध कोणतीही गय न करता कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा बी. वीरप्पा यांनी दिला.

यावेळी लोकायुक्त उपनिबंधक अरविंद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव के. एन. शिवकुमार, बेळगाव लोकायुक्त अधीक्षक प्रसन्न देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: