“कर्नाटक राज्य सरकार केवळ लोकांच्या भावनांचे राजकारण न करता त्यांच्या जीवनमानाशी निगडित प्रश्नांवर काम करते,” असे परखड प्रतिपादन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले.

मंगळुरू येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीपूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. किनारपट्टी आणि मलेटनाड भागाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देण्यासाठीच ही ऐतिहासिक बैठक घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांसह श्री काद्री मंजुनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले व पूजा-अर्चा केली. किनारपट्टी भागातील लोकप्रतिनिधी आणि खासदारांनी स्थानिक विकासकामे आणि विविध मागण्या मांडल्या असून, त्या सकारात्मकतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भागाचा विकास करताना पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक सेवा मजबूत करण्यावर सरकारचा भर असणार आहे. बंगळुरूप्रमाणेच मंगळुरू शहरालाही आर्थिक आणि पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची राज्य सरकारची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. कस्तुरीरंगन अहवालासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “या अहवालामुळे बाधित होणाऱ्या स्थानिक लोकांशी आणि शेतकऱ्यांशी मी स्वतः थेट संवाद साधणार आहे. त्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.” तसेच, या भागाची शांतता आणि आदरातिथ्याची परंपरा राखण्याचे आवाहन करत त्यांनी प्रस्तावित आंदोलने मागे घेण्याची विनंती केली. तसेच महात्मा गांधींचे वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक घराला भेट देऊन त्यांनी अल्पोपहार घेतला.
या बैठकीत पर्यटन सुधारणा आणि सामाजिक कल्याण योजनांसह किनारपट्टीच्या विकासाबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.


Recent Comments