Chikkodi

चिक्कोडीत गोप्रेमाचा अनोखा दाखला; गर्भवती गाईचे थाटामाटात पार पडले डोहाळे जेवण!

Share

शेतकरी आपल्या पाळीव प्राण्यांना केवळ मुके प्राणी न मानता कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपतात, याचा प्रत्यय चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा गावात आला आहे. येथील गणपती महादेव सांगावे या शेतकरी कुटुंबाने आपल्या ‘गौरी’ नावाच्या गर्भवती गाईचे मोठ्या उत्साहात डोहाळे जेवण घालून गोप्रेम व्यक्त केले आहे.

सध्या सात महिन्यांची गर्भवती असलेल्या ‘गौरी’ गाईला सुंदर साडी, फुलांचे हार आणि हातात बांगड्या घालून सजवण्यात आले होते. एखाद्या महिलेच्या डोहाळे जेवणाप्रमाणेच हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला.

पुरोहित बाबासाहेब डवरी आणि स्वामीजींच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले. सुवर्णा गणपती सांगावे, पल्लवी शुभम सांगावे यांच्यासह महिलांनी गोमातेची पूजा करून तिची ओटी भरली. सुवासिनींनी औक्षण करत पारंपरिक गाणी गाऊन गौरीला आशीर्वाद दिले.

या अनोख्या सोहळ्यास गावातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंकर रेंदाळे, बाळू सांगावे, विष्णू बुबनाळे, पुंडलिक बुबनाळे, अरुण माळी, डॉ. बाळासाहेब चिकले यांच्यासह शेकडो गावकऱ्यांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. सांगावे कुटुंबाच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डी. के. उप्पार
इन न्यूज चिक्कोडी

Tags: