Belagavi

बेंगळुरूमध्ये मोफत मौखिक आरोग्य तपासणी शिबिराचे लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते उद्घाटन

Share

नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या शासनाच्या संकल्पाला यश मिळण्यासाठी जनता आणि संस्थांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.

बेंगळुरू येथील आर. आर. नगर येथे के. डी. सी. डेंटल केअर आणि पी-कॅन्सर सेंटरतर्फे आयोजित मोफत मौखिक आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या.
१५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान राबवण्यात येणारी ही मोहीम नागरिकांमध्ये मौखिक आरोग्याची जागृती निर्माण करण्यासोबतच गरजूंपर्यंत योग्य तपासणी व उपचाराचे मार्गदर्शन पोहचवणारा महत्त्वाचा उपक्रम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आधीच काळजी घेऊन सुरुवातीच्या टप्प्यातच तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येकाने मौखिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि अशा आरोग्य जनजागृती कार्यक्रमांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत शासनाच्या प्रयत्नांना खासगी संस्था, वैद्यकीय क्षेत्र आणि संघटनांनी सहकार्य केल्यास आरोग्यदायी समाजाची निर्मिती शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याच वेळी स्वातंत्र्यदिनानिमित्त लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमाला डॉ. निरंजन परमशेट्टी, डॉ. भाग्यालक्ष्मी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: