कर्नाटक मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना पुन्हा मंत्रीपद द्यावे, अशी मागणी ऑल इंडिया दलित युथ ऑर्गनायझेशनने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.

ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लेश जी. चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. लक्ष्मी हेब्बाळकर यांचा राजकीय अनुभव, प्रशासकीय कौशल्य आणि सामाजिक कार्य विचारात घेऊन त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे, असा आग्रह यात धरण्यात आला आहे.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केपीसीसी महिला अध्यक्षा म्हणून पक्षसंघटनेत मोलाचे योगदान दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मागील सरकारमध्ये महिला व बालविकास मंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या ‘गृहलक्ष्मी’ योजनेमुळे कोट्यवधी महिलांना आर्थिक मदत मिळून महिला सक्षमीकरणाला बळ मिळाले, असा उल्लेख निवेदनात आहे. तसेच अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्ग, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासाला त्यांनी प्राधान्य दिल्याचे सांगण्यात आले.
“लक्ष्मी हेब्बाळकर यांना पुन्हा मंत्रीपद दिल्यास महिला नेतृत्वाला ताकद मिळेल आणि सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक मजबूत होईल,” असे ऑल इंडिया दलित युथ ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लेश जी. चौगुले यांनी म्हटले.
या निवेदनाच्या प्रती विरोधी पक्षनेते राहुल गांधी, एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि कर्नाटक काँग्रेस प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात लक्ष्मी हेब्बाळकर यांना संधी मिळणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


Recent Comments