Belagavi

मतदारयादी पुनरीक्षण: बेळगाव जिल्ह्यात ८८ टक्के काम पूर्ण; जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

Share

भारतीय निवडणूक आयोग व राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बेळगाव जिल्ह्यात विशेष मतदारयादी पुनरीक्षणाचे काम यशस्वीपणे सुरू असून ८८ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

बेळगाव जिल्ह्यातील प्रारुप मतदारयादीत एकूण ४१,०७,००० मतदार असून, त्यापैकी आतापर्यंत ३५,८८,७५९ मतदारांचे फॉर्म गोळा करून डिजिटलायझेशन व पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित गैरहजर, स्थलांतरित, मृत आणि दुबार स्वरूपातील ५,१३,७८६ मतदारांची नोंद ‘एएसडीडी’ (ASDD) यादीत करण्यात आली आहे.

ही यादी बीएलओंच्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना देऊन क्रॉस व्हॅरिफिकेशन करण्यात आले आहे. आता उर्वरित केवळ ४,४५५ प्रकरणांचे डिजिटलायझेशन तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

मतदारयादीतील मॅपिंग आणि त्रुटी दुरुस्तीबाबत माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी असलेल्या ४.५ लाख त्रुटी आता २,१२,००० वर आल्या आहेत. राज्यात बेळगाव जिल्ह्यात त्रुटींचे प्रमाण सर्वात कमी (५.१७ टक्के) असून ते आणखी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.

त्रुटी असलेल्या व मॅपिंग नसलेल्या प्रकरणांमध्ये नोटिसा जारी करून सुनावणी घेतली जात आहे. ही प्रक्रिया मतदारांची नावे वगळण्यासाठी नसून नावांचे स्पेलिंग आणि मॅपिंग दुरुस्त करण्यासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: