मलप्रभा उजव्या कालव्यात तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन लवकरच पाणी सोडण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

सवदत्ती तालुक्यातील हिरेकोंबीसह १५ हून अधिक गावांमध्ये पावसाअभावी विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मलप्रभा जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही कालव्यातून पाणी सोडले जात नसल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली.

कर्नाटक राज्य रयत संघाचे नेते चूनप्पा पुजारी आणि शशिकांत गुरूजी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने बेळगाव जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक आयुक्तांची भेट घेत कालव्यात तातडीने किमान २ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली. पाणीटंचाईमुळे गावांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
यावेळी चूनप्पा पुजारी यांनी पावसाअभावी या भागातील अनेक विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडल्याचे सांगितले. जलाशयात पाणी उपलब्ध असूनही कालव्यात पाणी सोडले जात नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कालव्यात पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. आज संध्याकाळपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून उद्या किंवा परवा संबंधित तलाव आणि कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल शशिकांत गुरूजी यांनी सवदत्ती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा प्रशासन आणि सरकारचे आभार मानले.


Recent Comments