Belagavi

बेळगाव: मराठा मंडळात आषाढी एकादशीचा सांस्कृतिक सोहळा

Share

आषाढी एकादशीनिमित्त बेळगावच्या चव्हाट गल्लीतील मराठा मंडळ संस्थेत पालखी सोहळा आणि रिंगण कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना संस्कृती आणि आध्यात्मिक मूल्यांची ओळख करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मराठा मंडळ संस्थेतील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल-रुक्मिणी पालखीची विशेष पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या आवारात पारंपरिक पद्धतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि अभंगांच्या गायनात विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

काही विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीची वेशभूषा साकारली होती. मिरवणुकीदरम्यान भजन, कीर्तन आणि अभंगांच्या सादरीकरणामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. युवा पिढीला भारतीय संस्कृती, परंपरा आणि धार्मिक मूल्यांची माहिती करून देणे हा या आयोजनामागील उद्देश असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मराठा मंडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक व उपप्राचार्य एम. के. पाटील, सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. एम. पाटील, जिजामाता हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एल. बी. जाधव आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या कविता पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: