Belagavi

बेळगाव: वडगाव विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात

Share

‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावच्या वडगाव येथील पुरातन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटेपासून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने वडगावच्या पुरातन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी देवीच्या मूर्तींना महाअभिषेक, आकर्षक आरास आणि महाआरती करण्यात आली. यंदा मागील दोन वर्षांच्या तुलनेत भाविकांची संख्या वाढल्याने स्थानिक सेवक आणि विठ्ठल मंदिर विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरळीत दर्शनासाठी व्यवस्था केली होती. बेळगाव शहरासह परिसरातील ग्रामीण भागातून आलेल्या भाविकांनी दिवसभर दर्शन घेतले.

मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शंकर पाटील गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल मंदिर भजनी मंडळ आणि महिला भजनी मंडळाकडून भजन सादर करण्यात आले. जीव्हेश्वर महिला मंडळ, जागृती महिला स्वावलंबन केंद्र आणि जागृती महिला किशोरी गटाच्या वतीने विष्णुसहस्रनाम पठण करण्यात आले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून गजानन घाटगे, कुश महाराज, शुभांगी कारेकर आणि विशाल मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली ४० बालकलाकारांच्या पथकाने संगीत भजन सादर केले. या सादरीकरणाला भाविकांचा प्रतिसाद मिळाला. रात्री विविध वारकरी मंडळांच्या भजन कार्यक्रमांनी वडगाव बाजार गल्लीतील पुरातन मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले, अशी माहिती मंदिराच्या प्रमुखांनी दिली.

Tags: